बरेली (उत्तर प्रदेश) Bareilly Crime News : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आलीय. छेडछाडीचा प्रतिकार करणं एका विद्यार्थीनीला जीवघेणं ठरले. छेडछाडीला विरोध केल्यावर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी विद्यार्थीनीला रुग्णालयात दाखल केल आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचबरोबर या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल एसएसपींनी इन्स्पेक्टर-कॉन्स्टेबलला निलंबित केलंय. दरम्यान, आरोपी आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या विद्यार्थीनीच्या उपचाराचा खर्च जिल्हा प्रशासन उचलणार आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगींच्या सूचनेनुसार करण्यात आलीय.
विद्यार्थीनीची प्रकृती चिंताजनक : मिळालेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्यासाठी जाते. वाटेत एक तरुण अनेकदा तिला मार्ग अडवून त्रास देत होता. अनेकवेळा या तरुणानं विद्यार्थिनीला त्रास दिला. छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीनं याबाबत तिच्या कुटुंबीयांकडे तक्रारही केली होती. याबाबत कुटुंबीयांनी आरोपीच्या नातेवाईकांकडेही तक्रार केली होती. ही विद्यार्थीनी मंगळवारी कोचिंगला गेल्याचं सांगण्यात आलं. मात्र यानंतर ती रेल्वे क्रॉसिंगजवळ गंभीर अवस्थेत सापडली. तिचा एक हात आणि दोन्ही पाय कापण्यात आले होते. या तरुणानंच तिला ट्रेनसमोर फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत विद्यार्थीनीला रुग्णालयात दाखल केले. मोठ्या प्रमाणात हाडं मोडल्यानं विद्यार्थीनीची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी विद्यार्थिनीचा छळ करत होते, असं कुटुंबीयांचे म्हणणं आहे. याबाबतची तक्रार आरोपीच्या कुटुंबीयांकडेही करण्यात आली होती. दरम्यान कुटुंबीयांची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितलंय. या अधिक प्रकरणाचा तपास पोलीसांकडून सुरू आहे.