श्रीनगर :जम्मूमधील हवाई दल स्टेशनवर ड्रोन हल्ल्याच्या संशयी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने श्रीनगरमध्ये ड्रोनच्या वापरावर बंदी घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी असा आदेश जारी केला असून पोलिसांना ड्रोन संबंधित कामांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. जिल्ह्याच्या प्रदेश कार्यक्षेत्रात ड्रोन किंवा तत्सम इतर उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे, असे श्रीनगरचे जिल्हाधिकारी मोहम्मद एजाज यांनी सांगितले. तसेच महत्वाची प्रतिष्ठाने व जास्त लोकवस्ती असलेल्या भागांजवळ हवाई क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी सर्व सामाजिक व सांस्कृतिक मेळाव्यात ड्रोनचा वापर थांबविणे आवश्यक आहे. जेणेकरून जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान होण्यापासून आपण दूर राहू, असेही एजाज म्हणाले.
हल्ल्याचा तपास एनआयएनच्या ताब्यात
यापूर्वी प्रशासनाने जम्मू विभागातील सीमावर्ती राजौरी जिल्ह्यामध्ये ड्रोनच्या वापरावर बंदी घातली होती. गेल्या रविवारी पोलिसांनी सांगितले की, त्यांना लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात सामील असल्याचा संशय आहे. ज्यामध्ये ड्रोनने जम्मू हवाई दल स्टेशनवर स्फोटके पाडण्यात आले. यामध्ये एका इमारतीला किरकोळ नुकसान झाले होते. या हल्ल्याचा तपास एनआयएने ताब्यात घेतला आहे. केंद्रशासित प्रदेशात महत्वाच्या सुरक्षा आणि सरकारी आस्थापनांच्या जवळपास सुरक्षा आणि पाळत ठेवण्यात आली आहे.