चंदीगड : पंजाबमध्ये मोबाईल इंटरनेट आणि एसएमएस सेवेवरील बंदी 21 मार्चपर्यंत वाढवली आहे. पंजाबमध्ये सर्व मोबाइल इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाइल रिचार्ज वगळता) आणि व्हॉईस कॉल वगळता मोबाइल नेटवर्कवर प्रदान केलेल्या सर्व डोंगल सेवा उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत बंद असतील. सरकारने या बाबतचे नोटिफिकेशन जारी केले आहे.
अमृतपालचा शोध अजूनही सुरू : पंजाबमध्ये आजही खलिस्तान समर्थक अमृतपालला अटक करण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे. काल पोलिसांनी जालंधरच्या मेहतपूर भागातून अमृतपालची एक कार जप्त केली होती. या कारमधून पोलिसांनी एक रायफल आणि काही गोळ्या देखील जप्त केल्या आहेत. अमृतपालचे काका आणि ड्रायव्हर यांनी आज जालंधरमध्ये सरेंडर केले, तर अमृतपालचा शोध अजूनही सुरू आहे.
आत्तापर्यंत 78 जणांना अटक : पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधीक्षकांनी सांगितले की, अमृतपाल सिंहचा शोध अजूनही चालू आहे. पंजाब पोलिसांनी आतापर्यंत त्याच्या 112 समर्थकांना अटक केली असून संघटनेच्या सुमारे 78 जणांना अटक केली गेली आहे. पोलिसांनी काल जालंधरमध्ये 'फ्लॅग मार्च' काढला होता. पंजाब सरकारने अमृतपाल सिंह आणि त्याची संघटना 'वारीस पंजाब दे' विरोधात राज्यभर कठोर कारवाई सुरू केली आहे.
पंजाब हाय अलर्टवर :अमृतपालच्या अटकेवरून पंजाब सरकार हाय अलर्टवर आहे. काल पोलिसांनी अमृतपालचा फायनान्सर दलजीत सिंग कलसी याला अटक केली होती. त्याच्याकडूनही अमृतपालबाबत माहिती मिळवने चालू आहे. आजही राज्यभर अटकेचे सत्र सुरु आहे. आतापर्यंत पोलिसांनी 300 हून अधिक गोळ्या, 7 अवैध शस्त्रे, एकूण 3 वाहने आणि काही फोन जप्त केले आहेत. हे सर्व प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. काल अमृतपाल सिंहच्या वडिलांनी काही अनुचित प्रकार घडेल अशी भीती व्यक्त केली होती. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात अमृतपाल सिंहच्या संदर्भात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा :Amritpal Singh Arrest Issue : अमृतपालला अटक करण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच, काका आणि ड्रायव्हर पोलिसांना शरण