नवी दिल्ली -केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष वाढला आहे. कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ मुजफ्फरनगरमधील गावातील लोकांनी भाजपा नेत्यांवर बहिष्कार टाकला आहे. तसेच 'भाजपा नेत्यांना गावात प्रवेश करण्यास सक्त मनाई' असा आशय असलेली पोस्टर्सही गावाबाहेरील मुख्य मार्गावर लावण्यात आली आहेत.
मुजफ्फरनगरमधील गावांमध्ये भाजपाविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. सरकारविरोधात पोस्टर्स लागल्याने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांकडून संबंधित पोस्टर्स हटवण्यात येत आहेत. टिकरी आणि सिंघू सीमेवरील जमलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. प्रजास्ताक दिनी ट्रॅक्टर परेडला गालबोट लागल्यानंतर शेतकरी घराकडे निघाले होते. मात्र, शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज सीमेवर येऊ लागली आहे.