भोपाळ (मध्य प्रदेश) : नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत हनुमानाचा मुद्दा गाजला होता. त्यावेळी कॉंग्रेसने बजरंग दलाविरोधात जाहीर भूमिका घेतली होती. पक्षाने त्यावेळस राज्यात अशा संघटनांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही म्हटले होते. मात्र आता कॉंग्रसेच्या भूमिकेत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी नुकतेच बजरंग दलाबाबत एक मोठे वक्तव्य केले.
बजरंग दलात अनेक चांगले लोक आहेत : 'मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आल्यास बजरंग दलावर बंदी घातली जाणार नाही. बजरंग दलात अनेक चांगले लोक आहेत, मात्र त्यात जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना सोडले जाणार नाही', असे दिग्विजय सिंह म्हणाले. तसेच, 'बजरंग दल ही गुंडाची संघटना असून, त्याद्वारे अनेक समाजकंटक समाजात फिरत आहेत', असेही दिग्विजय सिंह म्हणाले.
मी कोणत्याही भाजपा नेत्यापेक्षा मोठा हिंदू आहे : एका प्रश्नाच्या उत्तरात दिग्विजय सिंह म्हणाले की, 'मी हिंदू आहे आणि हिंदूच राहणार. मी कोणत्याही भाजपा नेत्यापेक्षा मोठा हिंदू आहे', असेही ते म्हणाले. भाजपाने कमलनाथ यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडले, असे दिग्विजय सिंह म्हणाले. 'देशात सर्वाधिक हिंदू आहेत. त्यांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. कमलनाथ यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला. आमचा विश्वास संविधानावर आहे आणि राहील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते', असे दिग्विजय सिंह म्हणाले.