मुंबई : बॉलिवूडचा नावाजलेला अभिनेता आयुष्मान खुरानाच्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. आयुष्मानचे वडील आणि सुप्रसिद्ध ज्योतिषी पी. खुराना यांचे आज सकाळी चंदीगड येथे निधन झाले. नुकतेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने चंदीगड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. आज सकाळी व्हेंटिलेटरने काम करणे बंद केले. त्यांच्यावर आज सायंकाळी 5.30 वाजता चंदीगड येथील मणिमाजरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. आयुष्मानच्या वडिलांच्या निधनामुळे संपूर्ण घरात दुःखाचे वातावरण असून नातेवाईक आणि अनेक सेलिब्रिटींनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
वडिलांच्या भविष्यवाणीने बनवले आयुष्मानला स्टार : आयुष्मान खुराणा अनेकदा त्याच्या वडिलांसोबतच्या त्याच्या बाँडिंगबद्दल बोलत असे. आयुष्मानने बॉलिवूडमधील आपल्या करिअरचे श्रेय वडिलांना दिले आहे. त्याच्या वडिलांनीच आयुष्मान बॉलीवूड अभिनेता होईल असे भाकीत केले होते. पी खुराणा यांनी आयुष्मान चित्रपटात जाईल असे भाकीत केले होते आणि लवकरच मुंबईला जाण्यास सांगितले होते. आयुष्मान लवकर मुंबईला गेला नाही तर पुढची दोन वर्षे त्याला काम मिळणार नाही, असा इशाराही त्याच्या वडिलांनी दिला होता. दुसऱ्या दिवशी बॅग भरल्यानंतर त्याला जबरदस्तीने तिकीट देऊन मुंबईला पाठवले गेले. त्यानंतर आयुष्मानने कधीच मागे वळून पाहिले नाही.