जोधपूर (राजस्थान) Ghee From Jodhpur To Ayodhya : भगवान रामाचं जन्मस्थान असलेल्या अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं जात आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं केलं जाईल. मंदिराच्या उद्घाटनाची तयारीही जोरात सुरू आहे. श्रीरामाची पहिली आरती जोधपूर येथून आणलेल्या तुपानं केली जाईल. त्यासाठी ६०० किलो शुद्ध देशी तूप बैलगाडीनं अयोध्येला रवाना करण्यात आलं.
रावणाच्या सासुरवाडीतील तूप अयोध्येला :या तुपाबाबतची एक खास बाब म्हणजे, हे तूप जिथून नेलं जात आहे, ते ठिकाण रावणाची सासुरवाडी आहे! होय हे अगदी खरं आहे. रामाच्या पहिल्या आरतीसाठी जोधपूर येथून तूप नेलं जात आहे. जोधपूर हे राजस्थानमधील एक शहर आहे, ज्याचा रावणाशी पौराणिक संबंध आहे. पौराणिक कथांनुसार, रावणानं मंदोदरीशी, 'मंदोर' येथे लग्न केलं होतं, जी तिच्या वडिलांच्या राज्याची राजधानी होती. मंदोर हे ठिकाण आजच्या जोधपूर शहराच्या उत्तरेला ९ किमी अंतरावर आहे. या प्रदेशातील लोक आजही रावणाला त्यांचा जावई मानतात. ते रावण्याचा ज्ञानाची आणि पराक्रमाची प्रशंसा करतात. या प्रदेशात दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळण्याऐवजी त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला जातो.
तूप प्राचीन परंपरेनुसार तयार केलं :आता या भागातील तुपानं अयोध्योतील रामाची आरती केली जाणार आहे. यासाठी ६०० किलो तुपाचे १०८ कलश बैलगाडीनं अयोध्येला रवाना करण्यात आले. येथील महाराज संदीपनी यांनी सांगितलं की, हे देशी तूप प्राचीन परंपरेनुसार तयार केलं आहे. तुपाची शुद्धता राखण्यासाठी गायींच्या आहारात बदल करण्यात आला होता. गेल्या ९ वर्षांपासून गायींना फक्त हिरवा चारा आणि पाणी दिलं जात होतं. ९ वर्षांत गायींची संख्या ६० वरून ३५० पर्यंत वाढली. यापैकी बहुतांश गायी या रस्त्यावर अपघातग्रस्त किंवा आजारी पडलेल्या होत्या. हे तूप औषधी वनस्पतींच्या रसानं जतन केलं जातं. यात पाच औषधी वनस्पती घालून ते दर तीन वर्षांनी एकदा उकळलं जातं.
रथाचं ठिकठिकाणी स्वागत होणार :तुपासोबतच या बैलगाडीत १०८ शिवलिंगं आणि गणेश व हनुमानाच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. अयोध्येला जाणारा हा रथ पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक आले होते. हा रथ जोधपूरहून जयपूरमार्गे निघून भरतपूर, मथुरा, लखनऊमार्गे अयोध्येला पोहोचेल. यावेळी मार्गात ठिकठिकाणी त्याचं भव्य स्वागत होणार आहे.
हेही वाचा :
- अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही होणार वापर; कशी असेल सुरक्षा व्यवस्था
- अयोध्येतील राम मंदिराच्या २० पुजारी पदांसाठी तब्बल ३००० अर्ज!
- Ayodhya Ram Mandir : 'या' तारखेला होणार राम मंदिराचं उद्घाटन, पंतप्रधान मोदींनी निमंत्रण स्वीकारलं