अयोध्या Ayodhya Railway Station : येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली. अयोध्येतील रेल्वे स्टेशनचं नाव आता बदलण्यात आलंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तशी इच्छा होती.
काय आहे नवं नाव : 'अयोध्या जंक्शन' आता 'अयोध्या धाम जंक्शन' म्हणून ओळखलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबरला अयोध्या जंक्शनच्या नव्यानं बांधलेल्या इमारतीचं उद्घाटन करणार आहेत. त्यापूर्वी याचं नाव बदलून 'अयोध्या धाम जंक्शन' करण्यात आलं. फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार लल्लू सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर याची पुष्टी केली. यासह त्यांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आभार मानलंय.
योगी आदित्यनाथ यांची इच्छा होती : २१ डिसेंबर रोजी अयोध्या जंक्शनची पाहणी करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'अयोध्या धाम' असं नाव देण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर अयोध्या जंक्शनचं नाव बदलण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. भाजपा खासदार लल्लू सिंह यांनी जारी केलेल्या माहितीत ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकभावनेच्या अपेक्षेनुसार नव्यानं बांधलेल्या भव्य अयोध्या रेल्वे स्थानकाचं नाव बदलून 'अयोध्या धाम जंक्शन' करण्यात आलंय.
पंतप्रधान मोदी अयोध्योत येणार : ३० डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या अयोध्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. मोदी या दिवशी अयोध्या जंक्शनवरून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यासोबतच ते रामनगरीला सुमारे सहा हजार कोटींच्या योजनांची भेट देणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी अयोध्येतच तळ ठोकला आहे.
हे वाचलंत का :
- राम मंदिराच्या उद्घाटन दिनी सार्वजनिक सुट्टी हवी, संतांची केंद्र सरकारकडे मागणी
- ममता बॅनर्जी राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार का?
- भाजपाच रणछोडदास, राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण नसल्यानं संजय राऊतांचा भाजपाला टोला