मोहाली: मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ( IND vs AUS T20 Series ) विश्वचषकापूर्वी भारत त्यांचे योग्य संयोजन, विशेषत: मधल्या फळीतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, भारताने वर्चस्व गाजवले आहे. जर टीम इंडियाने ही मालिका जिंकली तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सलग दुसरा मालिका विजय ठरेल. यापूर्वी 2020 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तेव्हा तीन सामन्यांची मालिका 2-1ने जिंकली होती. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत एकूण नऊ टी-20 मालिका खेळल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये चार मालिका भारताने आणि दोन ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत. तीन मालिका अनिर्णित राहिल्या.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 हेड टू हेड ( India vs Australia T20 head to head ) -
टी-20 क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 23 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 13 सामने जिंकून भारताने वर्चस्व राखले आहे. ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध 9 विजय मिळवले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात टीम इंडियाच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर भारत येथेही पुढे आहे. टीम इंडियाने घरच्या मैदानावर 7 पैकी 4 सामन्यात कांगारूंचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर केवळ तीन सामने जिंकले आहेत.
संघाबद्दल बोलायचे झाले तर, विश्वचषकापूर्वी टीम इंडिया संघ बांधणीवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करेल. ज्यामध्ये मधली फळी भक्कम करण्यापूर्वी वेगवान गोलंदाजीवर विशेष लक्ष दिले जाईल. या मालिकेपूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने आपल्या प्रमुख गोलंदाजांना विश्रांती दिली होती, परंतु आता या गोलंदाजांचे भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्यामुळे त्यांचा ही कस पाहिला जाईल. कारण ऑस्ट्रेलियानंतर भारत तीन सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवणार आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये लवचिकता राखणे महत्त्वाचे ठरले असते परंतु कर्णधार रोहित शर्माने ( Captain Rohit Sharma ) आधीच स्पष्ट केले आहे की ऑस्ट्रेलियातील आयसीसी स्पर्धेपूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न त्याचे खेळाडू करतील.
बुमराह, हर्षलच्या कामगिरीवर असणार विशेष लक्ष -
आशिया चषक स्पर्धेत भारताने चांगली फलंदाजी केली असली तरी या काळात अनेक बदलही केले. या स्पर्धेत भारताच्या गोलंदाजीतील कमकुवतपणाही समोर आला, पण हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे आक्रमणाला बळ मिळाले आहे. रोहितने स्पष्ट केले की विश्वचषकात फक्त केएल राहुलच त्याच्यासोबत डावाची सुरुवात करेल, पण विराट कोहली त्याच्यासोबत डावाची सुरुवात करेल अशी शक्यता आहे. शेवटच्या टी-20 डावात शतक झळकावणाऱ्या कोहलीला काही सामन्यांसाठी सलामीवीर म्हणून मैदानात उतरवले जाऊ शकते.
ऋषभ पंत की दिनेश कार्तिक -
भारतीय फलंदाजी क्रमवारीतील अव्वल चार फलंदाज निश्चित झाले आहेत, परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत की दिनेश कार्तिक ( Rishabh Pant and Dinesh Karthik ) यांची निवड केली जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे भारत कार्तिकपेक्षा पंतला प्राधान्य देऊ शकतो कारण तो डावखुरा फलंदाज आहे. कार्तिकला 'फिनिशर'च्या भूमिकेसाठी सामील करण्यात आले आहे. त्याला आशिया चषक स्पर्धेत फलंदाजीची संधी मिळाली नाही, परंतु संघ व्यवस्थापन त्याला पुढील दोन आठवड्यात क्रीजवर थोडा वेळ घालवण्याची संधी देऊ शकते.