शिवहर -बिहारमधील शिवशर जिल्ह्यात सोमवारी रात्री एक अनोखं लग्न पार पडले. एका मुलाची आई असलेल्या काकूचं लग्न चक्क सख्य्या पुतण्यासोबत झाले. काका मजूरी करायला दुसऱ्या राज्यात गेले असता पुतण्या आणि काकूमध्ये प्रेमसबंध निर्माण झाले. त्यातून गावातील लोकांनी जबरदस्तीने हे लग्न लावून दिले. ही आश्चर्यकारक घटना तरियानी तालुक्यातील कुंडल गावात घडली.
गावकऱ्यांनी टाकला दबाव -
सात वर्षापूर्वी कुंडल गावचे रहिवाशी रामविनय सहनीचे लग्न शीला देवीसोबत झाले. त्यांना आता दोन वर्षाचा मुलगा देखील आहे. रामविनय परिवाराचा ऊदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्या राज्यात कामाला गेले. वर्षातून एक किंवा दोनदा ते घरी येत होते. दरम्यान शीला देवीचे पुतण्यासोबत सबंध वाढले. ते दोघेही गावाच्या बाहेर जात होते. तसेच अनेक दिवस गावाबाहेर राहत होते. मात्र गावातील नागरिकांची यांच्यावर नजर होती. त्यांना ही घटना खटकत होती. सोमवारी रात्री दोघेही बाहेरून घरी आले, तेव्हा गावातील नागरिक त्यांच्या घरी जमले. दोघांनाही घराच्या बाहेर काढले आणि लग्न करायला भाग पाडले. लोकांचा दबाव वाढल्याने दोघेही लग्नासाठी तयार झाले.
काकाला घटनेची माहितीही नाही...
रात्रीच्या वेळेस ही घटना घडत असल्याने घराबाहेर अंधार होता. त्यामुळे उजेडासाठी अनेकांनी आपल्या मोबाइलचे टॉर्च लावले. एका व्यक्तीने आपल्या घरून कुंकू आणले आणि पुतण्याने सख्य्या काकूला कुंकू भरले. गावातील शेकडो नागरिकांसमोर हा प्रकार घडला. मात्र पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली नाही. विशेष म्हणजे, त्या महिलेच्या पतीलाही या घटनेची काहीही कल्पना नाही.