नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी आत्मचरित्राच्या निमित्ताने पुन्हा काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. आझाद म्हणाले की, पक्षात गुंडगिरी शिगेला पोहोचली असून एकता कुठेच दिसत नाही असा थेट आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी लिहलेल्या आत्मचरित्राचे बुधवारी प्रकाशन होणार आहे. त्याचे काही भाग प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
संसदेत त्यांच्या जागेवर बसवून ठेवण्यात आले : कलम ३७० चा उल्लेख करून आझाद यांनी जयराम रमेश यांच्यावर जोरदार हल्ला केल्याचे समोर आले आहे. आझाद यांनी लिहिले की, जेव्हा भाजप सरकारने हे कलम हटवण्याची घोषणा केली होती, तेव्हा आम्हा सर्व नेत्यांनी विरोध केला होता. आम्ही संसदेत विरोध केला. आम्ही धरणे धरत बसलो होतो. मात्र, जयराम रमेश या धरणे आंदोलनात सहभागी झाले नाहीत आणि आज तीच व्यक्ती पक्षाचे सरचिटणीस तर आहेच, पण आयटीचेही प्रभारी आहेत. तसेच, आझाद यांनी लिहिले आहे की, जयरामेश यांना संसदेत त्यांच्या जागेवर बसवून ठेवण्यात आले होते.
पक्षाच्या कामकाजावर प्रश्न : सलमान खुर्शीद यांच्याबाबत आझाद यांनी लिहिले आहे की, त्यांनी जी-23 नेत्यांमधील माझ्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. आझाद यांनी पुढे लिहिलं आहे की, आम्ही कधीही पक्षाचा अवाजवी फायदा घेतला नाही, उलट आम्हाला जे काही मिळालं त्यापेक्षा कितीतरी पट जास्त वेळ आम्ही पक्षाला दिला, तर तुमच्यासारख्यांनी उपस्थिती दाखवण्याशिवाय काहीही केलं नाही. खरे तर खुर्शीद म्हणाले होते की, तुम्ही ज्या शिडीवरून चढता, एकदा का तुम्ही वर पोहोचलात की तिला लाथ मारता कामा नये. त्यांची टिप्पणी आझाद यांच्यासाठी होती. G-23 च्या माध्यमातून आझाद सतत पक्षाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत होते.