पलक्कड (केरळ) : अट्टापडी मधू खून प्रकरणात न्यायालयाने 13 आरोपींना सात वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने काल 14 आरोपींना दोषी ठरवले होते. या प्रकरणातील 16 वा आरोपी मुनीर याचा तीन महिन्यांचा कारावास तो रिमांडमध्येच असताना पूर्ण झाल्याने त्याला आता शिक्षा भोगावी लागणार नाही. या प्रकरणात एकूण 16 आरोपी होते.
दोन आरोपींची निर्दोष मुक्तता : न्यायालयाने या प्रकरणी दोन जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. काल मन्नारक्कड विशेष न्यायालयाने 14 जणांना आयपीसी 304 (2) च्या आरोपाखाली दोषी ठरवले होते. आरोपी हुसेन मेचेरील, मारकर, शमसुद्दीन, राधाकृष्णन, अबू बकर, सिद्दीक, उबेद, नजीब, जैजुमोन, सजीव, सतीश, हरीश, बिजू, मुनीर हे दोषी आढळले आहेत. न्यायालयाने याप्रकरणी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
2018 मधील घटना : या खटल्याच्या निकालावर तीन वेळा स्थगिती दिल्यानंतर आज यावर निकाल देण्यात आला. पोलिसांनी मधुच्या आई आणि बहिणीला विशेष सुरक्षा दिली होती. 22 फेब्रुवारी 2018 रोजी केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील अट्टापडी चिंडकी कॉलनीतील मल्लन आणि मल्ली यांचा 30 वर्षीय मुलगा मधू हा जमावाच्या हल्ल्यात ठार झाला होता. मधू चोर असल्याचा आरोप करत जमावाने त्याला पकडून बेदम मारहाण केली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि मधूला ताब्यात घेऊन त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
कुटुंबियांची उच्च न्यायालयात धाव : जमावाने केलेल्या हल्ल्यात झालेल्या जखमांमुळे मधूचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले होते. मधूला टोळीने पकडून मारहाण केल्याचे फुटेज सोशल मीडियावर प्रसारित केले गेले होते. फिर्यादी पक्षाने हे व्हिडिओ पुरावा म्हणून न्यायालयात सादर केले होते. घटनेला चार वर्षे उलटूनही खटला सुरू न झाल्याने मधूच्या आईने 2022 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. खटल्याच्या सुरूवातीला साक्षीदारांनी पक्षांतर केल्यानंतर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला. त्यानंतर तपास आणि खटला पूर्ण झाला.
हेही वाचा :Pakistani Infiltrator : सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी घुसखोराला गुजरातमध्ये अटक