वॉशिंग्टन - काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी (26 ऑगस्ट) दोन आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. एका अफगाण अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, या आत्मघातकी हल्ल्यात जवळपास 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 143 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये 13 अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांसह काही लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी ISIS या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या घटनेचा अमेरिकेने निषेध व्यक्त केला आहे. हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शोधून काढण्यात येईल आणि त्यांना याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दशतवाद्यांना दिला आहे. दरम्यान, यापूर्वीही अनेक हल्ल्यात खूप अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
यापूर्वीही झालेल्या हल्ल्यात अमेरिकी सैनिकांचा मृत्यू -
- 21 डिसेंबर 2015 : अफगाणिस्तानातील बगराम एअरफिल्डवर नाटो-अफगाण सैन्यदलाला लक्ष्य करत एका आत्मघाती हल्लेखोराने घडवून आणलेल्या स्फोटात अमेरिकन सैन्यदलातील सहा सैनिकांचा मृत्यू झाला होता. स्फोटकांनी भरलेल्या दुचाकीच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आला होता.
- 2 ऑक्टोबर 2015 : अमेरिकन वायुदलाचे सी-130जे हे मालवाहू विमान कोसळले. या दुर्घटनेत सहा अमेरिकन सैनिकांसह 11 जणांचा मृत्यू झाला होता.
- 17 डिसेंबर 2013 : अफगाणिस्तानातील हेलिकॉप्टर दुर्घटनेत अमेरिकेच्या सहा सैनिकांचा मृत्यू झाला होता.
- 4 मे 2013 : तालिबानच्या विशेष मोहिमेतील हल्ल्यादरम्यान नाटोच्या नेतृत्वातील दलातील सात अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता.
- 11 मार्च 2013 : दक्षिण अफगाणिस्तानातील एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत अमेरिकन सैन्यदलातील 5 जवानांचा मृत्यू झाला होता. तर, पूर्वेकडील अफगाणिस्तानमध्ये एका अफगाण पोलीस कर्मचाऱ्याच्या आतल्या हल्ल्यात अमेरिकेच्या दोन विशेष ऑपरेशन दलांना ठार करण्यात आले.
- 6 ऑगस्ट 2011 : रॉकेटचलित ग्रेनेडने हल्ला करून सैन्यदलाचे एक हेलिकॉप्टर बंडखोरांनी पाडले होते. यात अमेरिकेचे 30 सैनिक आणि अफगाणचे 8 सैनिक मारले गेले होते.
- 26 मे 2011 : पायी पाहणी करणाऱ्या पथकातील नाटोच्या 9 सैनिकांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. यात अमेरिकेच्या 7 सैनिकांचा समावेश होता.
- 19 एप्रिल 2011 : काबुलमधील अफगाण वायुदलाच्या मुख्यालयातील एका नियमित बैठकीदरम्यान अफगाणी अधिकाऱ्याने केलेल्या हल्ल्यात अमेरिकन वायुदलाचे 8 अधिकारी आणि 1 अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला होता.
- 27 ऑगस्ट 2010 : पूर्व आणि दक्षिण अफगाणिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात अमेरिकन सैन्यदलातील तीन सैनिकांचा मृत्यू झाला होता.
- 8 जून 2010 : एका आत्मघाती हल्ल्यात अमेरिकेचे 7 सैनिक, ऑस्ट्रेलियाचे 2 तर फ्रान्सच्या एका व्यक्तिचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात अमेरिकेच्या एका कंत्राटदाराचाही मृत्यू झाला होता.
- 27 ऑक्टोबर 2009 : दक्षिण अफगाणिस्तानातील दोन स्वतंत्र बॉम्बहल्ल्यात अमेरिकेचे आठ सैनिक मारले गेले होते.
- 26 ऑक्टोबर 2009 : हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये अमेरिकेच्या 11 सैनिकांचा मृत्यू झाला होता.
- 3 ऑक्टोबर 2009 : कामदेशमध्ये तीनशे बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू झाला होता. तर वर्दक प्रांतात एक बॉम्ब निकामी करत असताना त्याचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एका सैनिकाचा मृत्यू झाला होता.
- 13 जुलै 2008 : वानत येथील आऊटपोस्टवर बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या नऊ सैनिकांचा मृत्यू झाला होता. तर कजाकी सोफ्ला इथे रस्त्यानजिकच्या बॉम्बचा स्फोट होऊन आणखी एका सैनिकाचा मृत्यू झाला होता.
- 18 फेब्रुवारी 2007 : झाबुल प्रांतातील शाहजोई जिल्ह्यात एक हेलिकॉप्टर कोसळून अमेरिकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू झाला होता.
- 5 मे 2006: पूर्व अफगाणिस्तानमध्ये लढाऊ कारवाया दरम्यान CH-47 चिनूक हेलिकॉप्टर अपघातात 10 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता.
- 28 जून २००५: अमेरिकेचे MH-47 चिनूक हेलिकॉप्टर बंडखोरांनी खाली पाडले. यात स्पेशल फोर्स हेलिकॉप्टरमधील 16 अमेरिकी सैनिक मारले गेले. त्याच दिवशी अमेरिकेच्या तीन नौदल जवानांचाही मृत्यू झाला.
- 6 एप्रिल 2005: हेलिकॉप्टर बागरम येथील अमेरिकेच्या मुख्य तळावर परतत असताना वाळूच्या वादळात खाली गेले. यात 15 अमेरिकन सेवा सदस्य आणि तीन अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला.
- २9 जानेवारी २००४: शस्त्रास्त्रांच्या स्फोटात 8 अमेरिकन सैनिक ठार झाले.
- २३ मार्च २००३ : दोन जखमी अफगाण मुलांना मदत करण्यासाठी गेलेल्या अमेरिकेच्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला दक्षिण -पूर्व अफगाणिस्तानमध्ये अपघात झाला. त्यात सर्व सहा जण ठार झाले.
- 4 मार्च 2002 : दोन हेलिकॉप्टर आग लागली. या दुर्घटनेत सात अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला.
- 9 जानेवारी २००२ : अफगाणिस्तानात सैन्य परत पाठवणारे अमेरिकन लष्करी इंधन भरणारे विमान पाकिस्तानमध्ये कोसळले. त्यातील सात सैनिक ठार झाले.