काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील गुरुद्वारा कर्ते परवानवर भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुद्वारा कर्ता पर्वचे अध्यक्ष गुरनाम सिंग यांनी सांगितले की, शीख गुरुद्वाराच्या परिसरात गोळीबाराचे आवाज येत आहेत. अनेक स्फोटांचे आवाजही ऐकू आले. स्फोटामुळे आकाशात धुराचे लोट दिसत आहेत. मनजिंदर सिरसा यांनीही या हल्ल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, अफगाणिस्तानातील काबुलमधील गुरुद्वारा कर्ता पर्वचे भयानक दृश्य, ज्यावर आज सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. गुरुद्वारा साहिब संकुलात अनेक स्फोट झाले.
गुरुद्वारा साहिब येथे सर्वांच्या कल्याणासाठी शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली गेली. दहशतवादी संघटना ISIS च्या काही हल्लेखोरांनी गुरुद्वारामध्ये घुसून तेथील रहिवाशांची हत्या केल्याचा दावा केला जात आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ जारी करताना भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितले की, हल्ल्याच्यावेळी एका ग्रंथीसह 10 लोक गुरुद्वारामध्ये उपस्थित होते. सतत गोळीबार आणि स्फोटांचे आवाज येत आहेत. मात्र, गुरुद्वारामध्ये नेमके किती लोक आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.