सहारनपूर (उत्तर प्रदेश) : भीम आर्मीचे प्रमुख आणि आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर चार राऊंड गोळीबार केला. एक गोळी आझाद यांच्या कमरेला स्पर्श करून गेली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. आझाद यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. हल्लेखोर ज्या कारमधून आले होते, त्या कारचा क्रमांक हरियाणाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सीटखाली लपून जीव वाचवला : मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर आझाद दिल्लीहून परतत होते. ते कारमधून परतत असताना वाटेत अगोदरच थांबलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार सुरू केला. चंद्रशेखर आणि त्यांच्या चालकाने सीटखाली लपून आपला जीव वाचवला. एक गोळी चंद्रशेखर यांच्या कमरेला स्पर्श करून गेली. सुदैवाने या हल्ल्यात त्यांचे प्राण वाचले. गोळीबारानंतर हल्लेखोर शस्त्रे फेकून घटनास्थळावरून पळून गेले.
झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी : हल्ल्यानंतर तेथे एकच खळबळ उडाली. चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी त्यांना तातडीने देवबंद येथील रुग्णालयात नेले. तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. जिल्हा रुग्णालयाबाहेर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. या घटनेचा निषेध करत भीम आर्मीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण गौतम यांनी चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे.
समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन : घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. हा हल्ला कोणी केला याचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात कोम्बिंग सुरू केले आहे. चंद्रशेखर आझाद यांच्यावर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे समर्थकांमध्ये राग आहे. पोलिसांनी त्यांना पुरेशी सुरक्षा का दिली नाही, असे समर्थकांचे म्हणणे आहे. पोलीस हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. पोलिसांनी भीम आर्मीच्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
- Attacked On Shiv Sena Samajwadi Leader: शिवसेनेचे समाजवादी नेते राजीव महाजन यांच्यावर पंजाबमध्ये गोळ्या झाडून हल्ला