नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा सदनाच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने मंगळवारी सदनाकडून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आझादांवर स्तुतीसुमने उधळली. तर दुसरीकडे, खासदार रामदास आठवले यांनी मात्र आपल्या विशिष्ट शैलीमध्ये आझादांना निरोप दिला.
आठवले म्हणाले, तुम्ही पुन्हा सदनात या..
यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले, की तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. तुम्ही पुन्हा या सदनात यायला हवे. जर काँग्रेस पक्ष तुम्हाला या सदनात पुन्हा आणत नसेल, तर आम्ही (भाजपा) आणू. आमच्याकडे येण्यास तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही. मीदेखील आधी तिकडे होतो, आता इकडे आलोय. मी आलोय तर मग तुम्हाला काय अडचण आहे? असे ते मिश्कीलपणे म्हणाले. तसेच रिपब्लिकन पार्टी या आपल्या पक्षाकडून त्यांनी आझादांना सदिच्छाही दिल्या.
यावेळी आठवलेंनी गुलाम नबी आझादांसाठी एक कविताही सादर केली :
राज्य सभा छोड़ कर जा रहे गुलाम नबी
हम मिलते रहेंगे आपको कभी-कभी
आपका नाम है गुलाम, इसलिए मैं करता हूं आपको सलाम
आपका नाम है गुलाम लेकिन आप हमेशा रहे आजाद
आप हम सभी को रहेंगे याद