कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्व पक्षांनी आपापल्या प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या सर्व जिल्ह्यांमधून प्रचारयात्रा काढणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यात तब्बल ३०० प्रचारसभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आपल्या निवडणूक प्रचाराचा चेहरा म्हणून समोर आणले आहे. तर सत्ताधारी तृणमूलचा चेहरा केवळ आणि केवळ ममता बॅनर्जी असणार आहेत. तृणमूलच्या स्टार प्रचारकांमध्ये ममतांचे पुतणे अविषेक बंदोपाध्याय, तसेच सुब्रता बक्षी, पार्थो चक्रोपाध्याय, फिरहाद हकीम, अरुप बिस्वास यांसह इतरांचा समावेश आहे.