गुवाहाटी : शेतकरी नेते आणि आरटीआय कार्यकर्ते अखिल गोगोई यांनी आसाममध्ये इतिहास रचला आहे. तुरुंगात राहूनही निवडणूक जिंकणारे ते आसाममधील पहिले व्यक्ती ठरले आहेत. शिवसागर मतदारसंघातून काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवाराला हरवून त्यांनी विजय मिळवला आहे.
तुरुंगात राहिल्यामुळे त्यांना आपला कसलाच प्रचार करता आला नव्हता, हे वेगळं सांगायला नको. विशेष म्हणजे, त्यांच्याविरुद्ध उभ्या राहिलेल्या सुरभी राजकोनवारी यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी सभा घेतली होती. तरीही याठिकाणी गोगोई यांचा विजय झाला.
मोठ्या फरकाने मिळवला विजय..
अखिल यांनी काँग्रेसच्या सुब्रमित्र गोगोई यांचाही पराभव केला. याठिकाणी २०१६ साली काँग्रेसचे प्रणबकुमार गोगोई आणि भाजपाच्या सुरभी यांच्यात मुख्य लढत झाली होती. यात काँग्रेसचा विजय झाला होता. यावर्षीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी नेते अखिल गोगोईंना ५७ हजार १७३ मतं मिळाली. तर सुरभी आणि सुब्रमित्र यांना अनुक्रमे ४५,३९४ आणि १९,३२३ मतांवर समाधान मानावे लागले.