गुवाहाटी : पाकिस्तानने शुक्रवारी केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामध्ये देशाच्या चार जवानांना वीरमरण आले होते. यामध्ये आसामच्या एका वीरपुत्राचाही समावेश होता. या जवानाचे पार्थिव आज त्याच्या मूळ गावी पोहोचले असून, त्यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हुतात्मा चंद्रा रॉय यांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी रॉय यांना आर्मी बेस रुग्णालयात श्रद्धांजली वाहिली. रॉय हे अमर राहतील, आणि त्यांची शौर्यगाथा ही येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे ते यावेळी म्हणाले.
चंद्रा रॉय २००१ साली लष्करात भरती झाले होते. ते ५९ फिल्ड आर्टिलरी विभागात कर्तव्यावर होते. शत्रुशी लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्यामागे आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर आणि गावावर शोककळा पसरली आहे.