गुवाहाटी (आसाम) -आसाममधील पूरस्थिती ( Assam Flood ) गंभीर असून शनिवारी ( दि. 21 मे ) सकाळी पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. आसाम सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिलेल्या माहितीनुसार भूस्खलनामुळे पाच लोक मरण पावले आहेत तर पुरामुळे मृतांची संख्या नऊ झाली आहे.
लाखो नागरिकांना फटका - पुराच्या पाण्यात 29 जिल्ह्यांतील 3 हजार 246 गावे अंशत: किंवा पूर्णत: बुडाली आहे. स्त्रिया आणि मुलांसह एकूण 8 लाख 39 हजार 691 लोक बाधित झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ( ASDMA ) च्या अंदाजानुसार, पुरामुळे 6 हजार 248 घरांचे पूर्ण नुकसान झाले असून 36 हजार 845 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. याशिवाय पुराच्या पाण्याने अनेक ठिकाणचे पूल आणि बंधारे वाहून गेल्याने रस्ते, दळणवळणावर परिणाम झाला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 1 लाख 732.43 हेक्टर शेतजमीनही पुराच्या पाण्याखाली गेली आहे. काही भागातील उभ्या पिकांवर परिणाम झाला आहे.