नवी दिल्ली : आम आदमी पार्टी (आप) 17 आणि 18 जुलै रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या (पीएसी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केजरीवाल सोमवारी संध्याकाळीच बेंगळुरूला पोहोचतील. ते रात्रीच्या जेवणालाही उपस्थित राहणार असून दुसऱ्या दिवशी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत.
'आप' बैठकीत सहभागी होणार : बैठकीनंतर मीडियाशी बोलताना आप खासदार राघव चढ्ढा यांनी सांगितले की, 'पीएसीच्या बैठकीत प्रत्येक पैलूवर चर्चा झाली. दिल्लीचा अध्यादेश देशविरोधी आहे. अरविंद केजरीवाल यांनी या अध्यादेशाविरोधात सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य मागितले आणि त्यांनी आम्हाला सहकार्य दिले. काँग्रेस पक्षानेही या अध्यादेशाचा निषेध नोंदवला आहे'. आम आदमी पक्ष 17-18 जुलै रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी होणार आहे, असे राघव चढ्ढा म्हणाले.
कॉंग्रेसचा 'आप'ला पाठिंबा :काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी रविवारी दुपारी सांगितले की, पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. पक्ष राज्यपालांमार्फत विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या केंद्राच्या हालचालींना विरोध करेल. तसेच तसे कोणतेही विधेयक आले तर संसदेतही विरोध करेल. दिल्लीच्याच नाही तर अशा कोणत्याही विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वेणुगोपाल म्हणाले.
बेंगळुरूमध्ये केजरीवालांचे पोस्टर लागले :विरोधकांच्या बैठकीपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांचे पोस्टर बेंगळुरूमध्ये लावण्यात आले आहे. काँग्रेसने केजरीवाल यांच्या सहभागाची आशा व्यक्त केली आहे. कर्नाटक सरकारचे मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, दिल्ली अध्यादेशाचे समर्थन केले जाऊ शकत नाही. तो पूर्णपणे देशाच्या संघीय रचनेच्या विरोधात आहे. भाजप दिल्लीतून सर्वकाही नियंत्रित करण्याचा आणि बिगर भाजपशासित राज्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. केसी वेणुगोपाल जे म्हणाले ते योग्य पाऊल आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा :
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल नाराज का झाले? तेजस्वी यादव म्हणाले...
- Eknath Shinde : 'बैठक पाटण्यात घ्या, नाहीतर . . . आम्हाला फरक पडत नाही', मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
- Patna Opposition Meeting : 'तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाही', विरोधकांच्या बैठकीनंतर कोण काय बोललं? जाणून घ्या