नवी दिल्ली Arvind Kejriwal on BJP :आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी आपल्या मतदारसंघातील स्वयंसेवकांना संबोधित करताना एक वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, 2014 आणि 2019 मध्ये देशातील जनतेनं भाजपाला ऐतिहासिक बहुमत दिलं. भाजपाला हवं असतं तर ते देशाला प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकले असते, पण आज संपूर्ण देशाचं वातावरण बिघडलंय. सर्वत्र मारामारी, गुंडागर्दी, भ्रष्टाचार, लुटमार सुरू आहे. नोकऱ्या सतत कमी होत आहेत. देशात लोकसंख्या वाढत आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या देशातील जनतेसमोरील तीन सर्वात मोठ्या समस्या आहेत. अशा परिस्थितीत 2024 च्या निवडणुका देशासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. इंडिया आघाडी टिकली तर 2024 मध्ये भाजपाचं सरकार स्थापन होणार नाही, असंही केजरीवाल म्हणाले.
सामान्य लोकांनी केली आम आदमी पार्टीची स्थापना : मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला दुर्गापूजा, दसरा, दिवाळी, छठ सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाच्या स्वयंसेवकांना संबोधित करताना ते म्हणाले की, मी जेव्हा जेव्हा माझ्या विधानसभा मतदारसंघात जातो तेव्हा तिथले लोक केवळ दिल्ली सरकारचंच कौतुक करतात. तसेच आमच्या स्वयंसेवकांचंही कौतुक करतात. लोकं म्हणतात की, आमचे स्वयंसेवक खूप चांगले आहेत. आम्ही कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीतून आलेलो नाहीत. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, आतिशी, सौरभ भारद्वाज, हे सर्व माझ्यासोबत अगदी सामान्य लोक होते. आम्ही सामान्य लोकांनी मिळून आम आदमी पार्टीची स्थापना केली. त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे स्वयंसेवकही सामान्य पार्श्वभूमीतून आलेले आहेत. इतर पक्षांचे लोक त्यांच्या भागात अनेकदा गुंडगिरी करताना आणि शिवीगाळ करताना दिसत असल्याचं केजरीवाल म्हणाले.
2016 मध्ये नोटबंदीमुळं भारताची अर्थव्यवस्था किमान 10 वर्षे मागे गेली आहे. लोकांचे उद्योगधंदे, कारखाने, व्यवसाय बंद होते. आज संपूर्ण देशातील व्यापारी दु:खी आहेत. आधी नोटबंदी आणि नंतर जीएसटी आणली. जीएसटी खूप गुंतागुंतीचा विषय आहे, तो कोणालाच कळत नाही-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल