नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्र सरकारला एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढू नये यासाठी केंद्राच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. केजरीवाल म्हणाले की, 'राजधानीतील पुराच्या बातमीने जगाला चांगला संदेश जाणार नाही'.
'पुराच्या बातमीने जगाला चांगला संदेश जाणार नाही' : अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात केजरीवाल यांनी विनंती केली आहे की, 'शक्य असल्यास हरियाणातील हथनीकुंड बॅरेजचे पाणी मर्यादित वेगाने सोडले जावे'. दिल्लीत काही आठवड्यांत जी-20 शिखर बैठकीचे आयोजन होणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. 'देशाच्या राजधानीतील पुराच्या बातमीतून जगाला चांगला संदेश जाणार नाही. या परिस्थितीतून दिल्लीतील लोकांना वाचवावे लागेल', असे केजरीवाल यांनी अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
यमुनेच्या पाण्याची पातळी धोक्याच्या वर : केजरीवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, यमुनेच्या पाण्याची पातळी 207.55 मीटरने वाहत असल्याने दिल्लीत पूर येण्याची शक्यता आहे, ही पातळी 'धोक्याच्या पातळी'च्या वर आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'केंद्रीय जल आयोगाच्या अंदाजानुसार बुधवारी रात्री यमुनेची पातळी 207.72 मीटरपर्यंत पोहोचेल जी गंभीर चिंतेची बाब आहे. आदल्या दिवशी, अरविंद केजरीवाल यांनी तातडीची बैठक बोलावली होती. दुपारी 1 वाजता जुन्या रेल्वे पुलावरील यमुनेची पाण्याची पातळी 207.55 मीटर इतकी नोंदवली गेली होती, जी गेल्या 45 वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे. केजरीवाल यांनी पत्रात नमूद केले आहे की, यमुनेची यापूर्वीची सर्वोच्च पातळी 1978 मध्ये 207.49 मीटर इतकी नोंदवली गेली होती. तेव्हा राष्ट्रीय राजधानीत मोठी पूरस्थिती होती.
हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले : बुधवारी सकाळी दिल्लीच्या मयूर विहार भागातील यमुना खादरमधून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दिल्ली पोलिसांनी शहरातील पूरप्रवण भागात कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाय लागू केले आहेत. प्रशासनाने चार किंवा त्याहून अधिक लोकांना बेकायदेशीररित्या एकत्र येणे आणि गटांमध्ये सार्वजनिक हालचाली करण्यावर प्रतिबंध घातले आहेत.
हेही वाचा :
- Delhi Flood Alert : यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी; पाणी पातळी रेकॉर्ड ब्रेक करणार, नागरिकांच्या जीवाचे मात्र हाल