पाटणा -बिहार विधानसभा २०२० चे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर बिहार राज्य निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बिहार विधानसभेच्या २४३ मतदारसंघाचे आणि मध्यप्रदेशातील २८ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल उद्याच जाहीर होणार आहेत. त्या ठिकाणचीही मतमोजणीची तयारी प्रशानसाने पूर्ण केली आहे. एनडीएमध्ये भागीदार असलेल्या नितीश कुमार सत्ता राखण्यात यशस्वी होणारकी, धर्माचा नाही तर बेरोजगारीचा मुद्दा उचलून बिहार निवडणुकीला रंगतदार आणि चुरशीची करणाऱ्या महाआघाडीची सत्ता स्थापन होणार याचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे.
बिहार मध्यप्रदेशची मतमोजणी बिहारचे तख्त कोण राखणार हे उद्याच्या निकालात स्पष्ट होणार आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर बिहारमध्ये आरजेडीच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सत्तेत झेंडा फडकवणार का याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली आहे. बिहारमध्ये राजद हे काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजपा आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा चालणार का?
बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्त केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी बिहारमध्ये जाऊन प्रचारसभांचा धडाका लावला होता. फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणुका पार पाडल्या आता, बिहारमध्ये भाजप किती यशस्वी होते याचे चित्रही उद्याच स्पष्ट होईल.
मध्यप्रदेशात सिंदियांची प्रतिष्ठा पणाला-
मध्यप्रदेशातही काँग्रेस खिंडार पाडून भाजपवासी झालेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ठिकाणी क्राँग्रेसमधून भाजपात गेलेले २५ आमदार आणि ३ जणांचे निधन झाले म्हणून २८ जागांवर पोट निवडणुका लागल्या आहेत. या जागेचे निकाल काय लागणार या ठिकाणी काँग्रेस विजयी होणार की भाजप वरचढ चढणार हे मंगळावारी दुपारी स्पष्ट होईल.
बिहारच्या निकालासाठी ५५ ठिकाणी मतमोजणी-
बिहार राज्य निवडणूक आयोगाने उद्या होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी ३८ जिल्ह्यात तब्बल ५५ ठिकाणी व्यवस्था केली आहे. पाटणामध्ये एएन कॉलेजमध्ये स्ट्रांग रूम बनविण्यात आली आहे. या ठिकाणी चार स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतमोजणी परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोणातून सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. या मतमोजणीच्या ठिकाणी ईव्हीएम सुरेक्षेसाठी राज्यभरामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एकूण 19 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राज्या निवडणुक आयोगाच्या वतीने सुरक्षा दलाच्या 59 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मतमोजणीला लागणार वेळ-
मंगळवारी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. सुरूवातीला पोस्टल मतदांनाची मोजणी केली जाईल. त्यानंतर 8:30 वाजल्यापासून ईव्हीएमची मतांची मोजणी सुरू होईल. पाटणाच्या मतमोजणी केंद्रावर ५० फेरीमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत या ठिकाणची मत मोजणी सुरू राहण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीचा पूर्ण परिसर मतमोजणीपूर्वी निर्जंतुक केला जाणार आहे.
मध्यप्रदेशातील बहुमताचे गणीत-
मध्य प्रदेशमध्ये काँग्रसच्या सत्तेला सुरुंग लावून भाजप सत्तेत आली. मात्र, आता उद्याच्या निकालानंतर बहुमतात कोण येणार हे स्पष्ट होणार आहे. मध्यप्रदेशमध्ये एकूण सदस्य संख्या 230 आहे. सध्या एका आमदाराने राजीनामा दिल्याने हा आकडा २२९ झाला आहे. सध्य स्थितीतील आकडेवारींचा विचार करता, सत्तेत राहण्यासाठी ११५ हा बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे. सध्य स्थितीत भाजपकडे 107 आमदार आहेत. बहुमतासाठी भाजपला 8 आमदारांची गरज आहे. दुसरीकडे काँग्रेसजवळ ८७ आमदार आहेत. बहुमतांचा आकडा गाठण्यासाठी त्यांना या पोटनिवडणुकीतील सर्वच जागांवर म्हणजे 28 ठिकाणी विजय संपादन करावा लागणार आहे. तरच काँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकते.