लेह : लडाखच्या लेह जिल्ह्यात शनिवारी लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात झाला. येथे लष्कराचे एक वाहन खोल दरीत पडले. या अपघातात नऊ जवानांचा मृत्यू झाला असून, एक जवान जखमी झालाय. शनिवारी संध्याकाळी दक्षिण लडाखमधील न्योमा येथील कियारीजवळ हा अपघात झाला. लडाखच्या संरक्षण अधिकाऱ्याने या घटनेची महिती दिलीय.
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले : लष्कराच्या वाहनात १० सैनिक होते. हे वाहन लेहहून न्योमाच्या दिशेने जात होते. वाटेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन दरीत कोसळले. शनिवारी संध्याकाळी 4.45 वाजता ही घटना घडली. अपघातानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमी सैनिकांना लष्कराच्या वैद्यकीय युनिटमध्ये नेण्यात आले, जेथे आठ जवानांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याचे लेहचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पीडी नित्या यांनी सांगितले. तसेच आणखी एका जवानावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघातावर ट्विट करून शोक व्यक्त केलाय. 'लडाखमधील लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूने दु:ख झाले. त्यांनी आमच्या देशासाठी केलेली अनुकरणीय सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी जवानांना फील्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मी त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो', असे राजनाथ सिंह म्हणाले.
अमित शाहांनी शोक व्यक्त केला : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केलाय. 'लडाखमधील रस्ता अपघातामुळे मला खूप दुःख झाले. यात आम्ही आमचे शूर सैनिक गमावले आहेत. या दु:खाच्या वेळी संपूर्ण देश शोकाकुल कुटुंबियांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. त्यांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. जखमी लवकर बरे होवोत', असे ट्विट अमित शाह यांनी केले.
हेही वाचा :
- JMMU AND KASHMIR :जम्मू-काश्मीरच्या कोकेरनागमध्ये शस्त्रासह 3 दहशतवाद्यांना अटक; सुरक्षा दलाची कारवाई
- JK Encounter : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले 3 जवानांना वीरमरण, कुलगाममध्ये शोधमोहीम सुरु