श्रीनगर Army Dog Kent : श्वानांची जात ही आपल्या मालकाप्रती अत्यंत निष्ठावान म्हणून ओळखली जाते. याची प्रचिती आज जम्मू-काश्मिरमधील सैन्याच्या चकमकीदरम्यान आली. मंगळवारी संध्याकाळी राजौरी जिल्ह्यात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी भारतीय सैन्याच्या श्वान 'केंट'नं आपल्या हँडलरचं संरक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलं.
सैन्याच्या 'ऑपरेशन सुजलीगाला'मध्ये सर्वात पुढे होती : दहशतवाद्यांशी लढताना आर्मीच्या 'केंट' या शूर श्वानानं हँडलरचा जीव वाचवला. केंट सैन्याच्या 'ऑपरेशन सुजलीगाला'मध्ये सर्वात पुढे होती. ती दहशतवाद्यांच्या पळून जाण्याच्या मार्गावर सैनिकांच्या एका तुकडीचं नेतृत्व करत होती. दरम्यान, तिच्यावर प्रचंड गोळीबार झाला. तेव्हा हँडलरचं संरक्षण करत असताना केंटनं स्वतःचं जीवन अर्पण केलं. जम्मू संरक्षण पीआरओनं एका निवेदनाद्वारे ही बातमी दिली. केंट ही लॅब्राडोर जातीची श्वान होती. श्वानाचं वय ६ वर्ष होतं. केंट २१ आर्मी डॉग युनिटची मेंबर होती.
- चकमकीत एका जवानाचा मृत्यू :जम्मू-काश्मिरमधील नारला गावात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी आणि भारतीय सैन्याचा एक जवान ठार झाला. तर दोन जवान आणि एक विशेष पोलिस अधिकारी जखमी झाल्याचं जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी सांगितलं.