काठमांडू - नेपाळ-भारत सीमेवर सध्या तणावग्रस्त स्थिती आहे. या परिस्थितीत भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी एम.एम. नरवणे यांना नेपाळी लष्करातील मानद जनरल श्रेणी बहाल केली. ही परंपरा 1950मध्ये सुरू झाली होती.
जनरल एम. एम. नरवणे हे बुधवारी नेपाळमध्ये पोहचले असून त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा आहे. दोन्ही देशामध्ये शांतता प्रस्थापीत करणे, हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. एम. एम. नरवणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी वीणा नरवणेही आहेत. नेपाळने जारी केलेल्या वादग्रस्त नकाशानंतर भारताच्या उच्च नेत्याचा नेपाळचा दौरा करण्याची ही पहिली वेळ आहे. नेपाळचे लष्कर प्रमुख पूर्ण चंद्र थापा आणि भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या दरम्यान चर्चेतून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर आणि मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.