कोलकाता-भारतीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतप्त झाल्या आहेत. या निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेप्रमाणे जाहीर केल्याचा मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी संशय व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या प्रचाराचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठीच निवडणूक आयोगाने भाजपला मदत केल्याचा आरोपही मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काळीघाट येथे पत्रकार परिषद घेत भाजप व निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, सॅफ्रॉन कॅम्पच्या डोळ्यातून निवडणूक आयोगाने राज्यांकडे पाहू नये. निवडणूक आयोगाचा आदर ठेवून, मला प्रश्न विचारण्याची इच्छा आहे. पश्चिम बंगालमध्ये इतक्या टप्प्यात का निवडणूक घेण्यात येणार आहे? तर इतर राज्यांमध्ये एकाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. जर निवडणूक आयोगाकडून लोकांना न्याय दिला जात नाही तर, लोकांनी कोणाकडे जावे, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
पश्चिम बंगालमध्ये इतक्या टप्प्यात का निवडणूक घेण्यात येणार आहे? हेही वाचा-पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम, वाचा सविस्तर...
निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास-ममता बॅनर्जी
कितीही युक्त्या केल्या तरी विजयी होणारच असल्याचा विश्वास बॅनर्जी यांनी बोलून दाखविला. पुढे मुख्यमंत्री म्हणाल्या की, भाजपला ज्या निवडणुकीच्या तारखा हव्या होत्या, त्याप्रमाणे तारखा असल्याचे सूत्राकडून माहिती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री हे राज्याच्या निवडणुकीसाठी त्यांच्या सत्तेचा गैरवापर करू शकत नाहीत. आपण राज्याच्या सुपुत्री असल्याचे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी सांगितले. भाजपपेक्षा पश्चिम बंगाल अधिक माहित आहे. निवडणुकीत तृणमुल काँग्रेस पक्ष विजयी होणार असल्याच्या त्यांनी पुनरुच्चारही पत्रकार परिषदेत केला.
हेही वाचा-रणधुमाळी ठरली! पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान
भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना -
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. अमित शाह यांनी मिशन बंगालचे लक्ष्य निश्चित केले. ममता बॅनर्जीही यावेळी भाजपाला गांभीर्याने घेतले आहे. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. निकालात भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.