नवी दिल्ली Apple Phone Hacking Alert :केंद्र सरकारनं अॅपल फोन हॅकिंग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले की, अॅपलनं १५० देशांमध्ये अॅडव्हायजरी जारी केली आहे.
अॅपलनं अंदाजाच्या आधारे अलर्ट पाठवला : प्रसारमाध्यमांशी बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, काही खासदारांनी अॅपलकडून अलर्ट मिळालाचा मुद्दा मांडला. याबाबत मी स्पष्ट करू इच्छितो की, सरकार या प्रश्नावर अत्यंत गंभीर आहे. आम्ही या प्रश्नाच्या तळापर्यंत जाऊ. तसंच या प्रकरणी चौकशीचे आदेश जारी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. 'आपल्या देशात असे काही लोकं आहेत ज्यांना टीका करण्याची सवयच झाली आहे. या लोकांना देशाची प्रगती झालेली पचत नाही. अॅपलकडे कोणतीही माहिती नाही. त्यांनी अंदाजाच्या आधारे हा अलर्ट पाठवलाय', असं ते म्हणाले.
काय आहे प्रकरण : मंगळवारी, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, काँग्रेस नेते राहुल गांधी, शशी थरूर, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह अनेक नेत्यांनी दावा केला की त्यांना अॅपलकडून एक इशारा मिळाला आहे. अॅपलनं पाठवलेल्या संदेशात असं म्हटलं आहे की, सरकार प्रायोजित लोक तुमच्या आयफोनशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही काय करता यावरून हे लोक तुम्हाला वैयक्तिकरित्या लक्ष्य करत आहेत.
विरोधकांचा सरकारवर हेरगिरीचा आरोप : महुआ मोईत्रा यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गृहमंत्रालयाला टॅग करत हा गंभीर आरोप केला. त्यानंतर शशी थरूर, प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील आपल्याला असा अलर्ट मिळाल्याचं सांगितलं. राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी सरकारवर हेरगिरीचा आरोप केला आहे.
हेही वाचा :
- Apple Alert Phone Hacking : फोन हॅकिंगचे प्रयत्न सुरू... महुआ मोईत्रा यांच्यापाठोपाठ राहुल गांधींचे मोदी सरकारवर गंभीर आरोप