करौली (राजस्थान) : Anna Hazare Warning Protest :राजस्थानमध्ये वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात 'ईआरसीपी'चा मुद्दा (ERCP project in Rajasthan) तापलाय. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपा आमनेसामने आहेत. त्याचबरोबर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare on ERCP project) यांनीही या मुद्द्यावर उघडपणे भूमिका मांडली आहे. राजस्थानमधील तोडाभीम येथे जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आलेल्या अण्णा हजारे यांनी 'ईआरसीपी'ला दिरंगाई झाल्यास पूर्व राजस्थानच्या भूमीतून दुसरं मोठं आंदोलन केलं जाईल, असं स्पष्ट केलंय.
सध्या मी 86 वर्षांचा असलो तरी अजून म्हातारा झालेलो नाही. त्यामुळं सरकारनं आता पूर्व राजस्थानमधील लोकांना 'ईआरसीपी' देण्यास दिरंगाई केली, तर मोठं आंदोलन उभारण्यास मागेपुढं पाहिलं जाणार नाही - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
'ईआरसीपी' म्हणजे काय? : राजस्थानमधील 'ईआरसीपी' (ईस्टर्न राजस्थान कालवा प्रकल्प) प्रकल्पावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये राजकीय चिखलफेक सुरू आहे. हा प्रकल्प राजस्थानमधील जवळपास 13 जिल्ह्यांसाठी आहे. या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती असते. त्यामुळं हा प्रकल्प येथील नागरिकांसाठी संजीवनी मानला जातो. या मुद्द्यावर दोन्ही राजकीय पक्षांनी अनेकदा विविध विधानं केली असून, एकमेकांवर आरोपही केले आहेत. सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या विषयात आता उडी घेतली आहे.
.
मोठं आंदोलन उभारण्यात येणार : 'ईआरसीपी' पूर्व राजस्थानसाठी खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. सरकारनं ईआरसीपी न दिल्यास पूर्व राजस्थानच्या भूमीत आणखी एक मोठं आंदोलन होईल. ईआरसीपीच्या मागणीचं मी उघडपणे समर्थन करतो. तसंच हा राष्ट्रीय प्रकल्प घोषित करण्यात सरकारनं दिरंगाई करू नये, अन्यथा मोठं आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी सरकारला दिलाय. पूर्व राजस्थान कालवा प्रकल्प किसान विकास समितीचे प्रदेशाध्यक्ष रामनिवास मीणा आणि राज्याचे मुख्य निमंत्रक रवींद्र मीणा यांच्या निमंत्रणावरून अण्णा हजारे राजस्थानमध्ये आले होते. येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी ईआरसीपीच्या मागणीचं समर्थन करत सरकारला इशारा दिलाय.