अलवर: अंजू आणि नसरुल्लाह प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अंजूने आपला प्रियकर नसरुल्लाहसोबत लग्न केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर तिने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंजूने तिच्या लग्नाचे वृत्त फेटाळून लावले आहे. नसरुल्लाहसोबत आपण लग्न केले नसल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या उत्तरावर पती अरविंदनेही माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. जर ती भारतात परतली तर तिच्याविरुद्धात गुन्हा दाखल करणार असल्याचे अरविंद म्हणाले आहेत.
भारतात परत येणार:पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरच्या प्रकरणानंतर भिवाडीतील दोन मुलांची आई अंजूची देशभरात चर्चा होत आहे. आपल्या नवऱ्याला सोडत अंजूने थेट पाकिस्तान गाठले. अंजूने पाकिस्तानातील प्रियकरासोबत लग्न केल्याच्या बातम्या माध्यमात आल्या आहेत. अंजूने तिचा प्रियकर नसरुल्लाहसोबत निकाह केल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावर अंजूने मौन सोडले असून आपण नसरुल्लाहशी लग्न केले नसल्याची प्रतिक्रिया तिने दिली. तसेच आपण काही दिवसातच भारतात परत येणार असल्याचेही म्हटले. यावर तिचा पती अरविंदने प्रतिक्रिया दिली आहे.
अंजूची व्हायरल स्टोरी: अंजू दरवेळी आपले विधान बदलत आहे. अंजू आधी म्हणाली होती की, ती फक्त फिरण्यासाठी पाकिस्तानात गेली आहे. परंतु त्यानंतर अचानकपणे तिने धर्म बदलून प्रियकर नसरुल्लाहसोबत निकाल केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्या दोघांचे प्री-वेडिंग शूट व्हिडिओही खूप व्हायरल झाले. याचबरोबर नसरुल्लाहच्या कुटुंबासोबत अंजू डिनर करत असल्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता.