हैदराबाद Andhra Pradesh Train Accident :आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर झाली. या अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, रेल्वे प्रशासनानं याला दुजोरा दिलेला नाही. विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेन विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनला पाठीमागून धडकली. विजयनगरम जिल्ह्यातील अलमांडा-कांकटपल्ली दरम्यान हा अपघात झाला. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आली आहे.
या अपघातात पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती स्थानिक प्रशासन, एनडीआरएफला देण्यात आली आहे. अपघात निवारण गाडीही घटनास्थळी पोहोचली आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून स्थानिक रुग्णालयात नेण्यात येत आहे - विभागीय रेल्वे व्यवस्थापक
पॅसेंजर ट्रेनला पाठीमागून धडक : दक्षिण कोस्ट रेल्वे झोनच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, ट्रेन 08532 विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर, 08504 विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरला धडकली, यात तीन डबे रुळावरून घसरले. मदतकार्य चालू आहे. वॉलटेअर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांनी सांगितलं की, बचावकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासन, एनडीआरएफला मदतीसाठी सूचित केलं आहे. अपघात निवारक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं की, मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी मदत कार्यासाठी सर्व व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. रुग्णवाहिका, इतर जीवनावश्यक वस्तू घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
आंध्र प्रदेशातील विजयानगरम जिल्ह्याजवळ एका पॅसेंजर ट्रेनची दुसऱ्या पॅसेंजर ट्रेनला टक्कर झाल्याने अपघात झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. बचावकार्य सुरू आहे, सर्वांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे - अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 2 गाड्यांची टक्कर झाल्याची माहिती ऐकून खूप दुःख झाले. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आणि जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे आणि भविष्यात असे अपघात होणार नाहीत याची काळजी -शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
ट्रेन ओव्हरहेड केबल कट :विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेन ओव्हरहेड केबल कट झाल्यामुळं उभी होती. त्याचवेळी विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन त्याच रुळावर मागून येऊन धडकली. या धडकेनंतर पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. या धडकेत बोगीचं मोठं नुकसान झालंय.