नवी दिल्ली: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. लवकरच आंध्र प्रदेशची राजधानी अधिकृतपणे विशाखापट्टणम होईल. सीएम रेड्डी यांनी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीच्या बैठकीत याची घोषणा केली. मार्चमध्ये विशाखापट्टणम येथे होणाऱ्या 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट'च्या तयारीसाठी दिल्लीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री रेड्डी यांनीही आपण विशाखापट्टणम येथे स्थलांतरित होणार असल्याचे सांगितले.
आंध्र प्रदेशात गुंतवणूक करण्याची विनंती:मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, राज्य सरकार 3 आणि 4 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन करत आहे. येत्या काही महिन्यांत त्यांचे कार्यालय विशाखापट्टणम शहरात स्थलांतरित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उद्योग क्षेत्रातील लोकांनी या बैठकीत सहभागी होऊन राज्यात गुंतवणूक करण्याची विनंती केली. गुंतवणूकदार समिटसाठी प्रतिनिधींना निमंत्रित करताना ते म्हणाले, 'येथे मी तुम्हाला विशाखापट्टणम येथे आमंत्रित करत आहे. विशाखापट्टणम येत्या काही दिवसांत आमची राजधानी असेल. येत्या काही महिन्यांत मी विशाखापट्टणमलाही स्थलांतरित होणार आहे. विशाखापट्टणममध्ये 3 आणि 4 मार्च रोजी गुंतवणूकदार परिषद आयोजित केली जाईल जिथे तुम्हाला पुन्हा भेटण्याची आशा आहे.'