अमरावती : आंध्र प्रदेश सरकारची बस कालव्यात कोसळून तब्बल सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना प्रकाशम जिल्ह्यातील दर्शीजवळील सागर कालव्यात सोमवारी मध्यरात्री घडली. पोडिली येथून काकीनाडा येथे लग्नाच्या रिसेप्शनला जाणाऱ्या नागरिकांवर काळाने घाला घातला असून घटनास्थळी प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. या अपघातात अब्दुल अजीज (65), अब्दुल हानी (60), शेख रमीज (48), मुल्ला नूरजहाँ (58), मुल्ला जानी बेगम (65), शेख शबिना (35), शेख हिना (6) यांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहेत.
भाड्याने घेतली होती बस :प्रकाशम जिल्ह्यातील पोडिली येथील सिराजच्या मुलीचा विवाह काकीनाडा येथे सोमवारी पार पडला. लग्न ( निकाह ) झाल्यानंतर वधू, वर आणि त्यांचे पालक काकीनाडा येथे कारमधून गेले. मंगळवारी वराच्या घरी रिसेप्शनला उपस्थित राहण्यासाठी बाकीचे कुटुंब जाणार होते. या कुटूंबांनी प्रकाशम जिल्ह्यातील ओंगोलू दिपोना येथून आरटीसी इंद्राबस भाड्याने घेतल्यानंतर मध्यरात्री काकीनाडाला रवाना झाले. पोडिलीपासून 20 किलोमीटर अंतरावर गेल्यावर दर्शीजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव असलेली बस पुलावरून सागर कालव्यात पडली. या अपघातात बसमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्वजण गाढ झोपेत असताना ही घटना घडली.