पालघर :श्रावण महिन्यातील सोमवारला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी महादेवाचे भक्त आवर्जून महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. पालघर तालुक्यातील माहीम येथे सुमारे 400 ते 500 वर्ष प्राचीन 'महेश्वरी मंदिर' आहे. या मंदिराची निर्मिती यजुर्वेदी ब्राह्मणांनी केली असल्याचा इतिहास आहे. या ठिकाणी श्रावणात मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी येत असतात. बिंबिसार राजा या भागात आल्यावर त्याच्या बरोबरीने यजुर्वेदी ब्राह्मण सुद्धा आले होते. काही काळाने सर्व इथे स्थिर स्थावर झाल्यावर, यजुर्वेदी ब्राह्मणांनी या किनारपट्टी गावांमध्ये विशेषतः शिरगाव, माहीम, केळवा, वसई व मुंबई येथे सुद्धा शंकरांच्या मंदिराची निर्मिती केली. असा उल्लेख 'यजुर्वेदी ब्राह्मणांचा' इतिहास या पुस्तकात पहावयास मिळतो.
यजुर्वेदी ब्राह्मणांनी जेव्हा या भागातून स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा 'हे मंदिर आमचे आहे. आम्ही हे घेऊन जाणार', असे त्यांनी ठरविले. ठरविल्यावर गावकऱ्यांमध्ये व ब्राह्मणांमध्ये वादावादी झाली. एके दिवशी रात्री खोदण्याचे सर्व सामान घेऊन यजुर्वेदी ब्राह्मणांनी गुपचूप ते मंदिर खणण्याच्या कामास सुरुवात केली. याचा सुगावा गावकऱ्यांना लागल्यावर गावकरी जमले व त्यांनी यासाठी विरोध केला. त्यावेळी ब्राह्मणांनी शेवटी तिथून पळ काढला. याबाबत नंतर तक्रारीही झाल्या, त्याचा न्याय निवाडा वसई येथे करण्यात आला. त्यावेळी वसई येथे पेशव्यांचा मुक्काम होता. पेशव्यांच्या दरबारात यजुर्वेदी ब्राह्मणांची साक्ष नोंदवली. तेव्हा साक्षीमध्ये सांगण्यात आले की, शिरगाव, माहीम, केळवा, वसई व मुंबई येथे शंकराची मंदिर आहेत. ती स्वतः यजुर्वेदी ब्राह्मणांकडून बांधण्यात आली आहेत. हे पेशव्यांनी मान्य केले व वसईचेही मंदिर त्यांचेच असल्याचा निर्णय पेशव्यांकडून देण्यात आला.