पंचकुला/मोहाली Anantnag Martyr Funeral : अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले कर्नल मनप्रीत सिंग आणि मेजर आशिष धौंचक यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (१५ सप्टेंबर) अंत्यसंस्कार करण्यात आला. मनप्रीत सिंग यांना त्यांच्या मूळ गावी मोहाली आणि आशिष धौंचक यांना पानिपतमध्ये अंतिम निरोप देण्यात आला.
विशेष विमानानं पार्थिव दिल्लीत :सुरुवातीला दोघांची पार्थिवं विशेष विमानानं दिल्लीला आणण्यात आली. त्यानंतर मनप्रीत सिंग यांचं पार्थिव शुक्रवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी भांजोरीयात घेऊन जाण्यात आलं. सैन्याचे अधिकारी जम्मू-काश्मीरमधून विशेष विमानानं त्यांचं पार्थिव घेऊन पोहोचले. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. मेजर आशिष धौंचक यांच्यावरही शुक्रवारीच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाला. त्यांच्या मूळ गावी बिंझौल इथं त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. बुधवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मोहालीचे रहिवासी कर्नल मनप्रीत हुतात्मा झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.
लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याचं होतं स्वप्न : कर्नल मनप्रीत यांचा जन्म ११ मार्च १९८२ रोजी मोहालीच्या भांजोरीया गावात झाला होता. हे गाव चंदीगडपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. लहानपणापासूनच त्यांचं सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होतं. कर्नल मनप्रीत सिंग यांचे वडील लखमीर सिंग यांचं २०१४ मध्ये निधन झालं. तेही सैन्यातून निवृत्त झाले होते. त्यांच्या कुटुंबात भाऊ संदीप सिंग, बहीण संदीप कौर आणि आई मनजीत कौर हे आहेत. त्यांची पत्नी जगमीत ग्रेवाल ह्या हरियाणात शिक्षण विभागात कार्यरत असून त्यांना कबीर सिंग हा ६ वर्षांचा मुलगा आणि बनी कौर ही २ वर्षांची मुलगी आहे.