अनंतनाग Anantnag Encounter : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात बुधवारी दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सैन्याच्या कर्नलसह सुरक्षा दलाचे तीन अधिकारी शहीद झाले. गडोले परिसरात मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सुरू करण्यात आली होती, मात्र रात्री कारवाई थांबविण्यात आली होती.
तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला : काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडर असलेले भारतीय सैन्याचे कर्नल आणि मेजर यांना आपला जीव गमवावा लागला. १९ आरआर सीओ कर्नल मनप्रीत सिंग यांना या चकमकीत वीरमरण आलं. त्यांनी समोरून आपल्या टीमचं नेतृत्व करत दहशतवाद्यांवर हल्ला केला. मात्र, दहशतवाद्यांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. मेजर आशिष धौनचक आणि डीएसपी हुमायून भट यांना देखील गोळ्या लागल्यानं ते जखमी झाले. या तिघांचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला.
मनप्रीत सिंग सेना पदकानं सन्मानित : शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांचं कुटुंब पंचकुलाच्या सेक्टर २६ मध्ये राहत असल्याची माहिती आहे. त्यांना सेना पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. या चकमकीत पानिपतचे रहिवासी मेजर आशिष धौनचक हे शहीद झाले. हरियाणाच्या बिंझौल गावातील रहिवासी असलेल्या आशिष याचं कुटुंब पानिपत शहरात भाड्याच्या घरात राहतं. तिथे त्यांची पत्नी त्यांच्या आई-वडिलांसोबत राहते. आशिष हे तीन बहिणींचे एकुलता एक भाऊ आहेत.