नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन ( parlment sesion ) सुरू होण्याच्या दोन दिवस आधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज (शनिवारी) सर्वपक्षीय बैठक घेणार ( All Party Meeting ) आहेत. ही बैठक संध्याकाळी संसदेत होणार असून, त्यात अनेक राजकीय पक्षांचे नेते सभागृहात सहभागी होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात कोणते मुद्दे मांडले जातील, विविध विधेयकांवर चर्चेसाठी किती वेळ दिला जाईल, यावर बैठकीत चर्चा होणार आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्याअसंसदीय शब्दांच्या यादीसारख्या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा होऊ शकते. लोकसभेचे अध्यक्ष संसदेचे प्रत्येक अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेत असतात. 18 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन ( Monsoon Session of Parliament ) सुरू होणार आहे. या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार अनेक नवीन विधेयके घेऊन येत आहे. एकूण 24 नवीन विधेयके संसदेत मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही सर्व विधेयके मंजूर होण्याचा प्रयत्न या अधिवेशनात केला जाईल. या विधेयकांमध्ये सहकार क्षेत्रातील सुधारणा आणि डिजिटल मीडियाशी संबंधित महत्त्वाच्या विधेयकांचाही समावेश आहे. यापैकी बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक 2022 हे महत्त्वाचे विधेयक मानले जात आहे.