मुंबई : अमूलच्या सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात थेट 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सहा महिन्यांत अमूलच्या दुधाच्या दरात एवढी मोठी वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे आता गृहिणींचे बजेट विस्कळीत होणार आहे.
खरेदी दरात वाढ : दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने ही वाढ करण्यात आली आहे. अमूल डेअरी नुसार, त्यांनी पशुसंवर्धनाच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी दूध खरेदी दरात 20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता दूध खरेदीचे दर 800 रुपयांवरून 820 रुपये झाले आहेत. ही दरवाढ आज 1 एप्रिलपासून लागू झाली आहे. तसेच अमूल प्रत्येक पशुपालकाला 2 लाख रुपयांचा जीवन विमा देणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या दोन मुलांपर्यंतचा विमा देखील उतरवला जाईल.
उत्पादकांसाठी अपघाती विमा : प्रसारमाध्यमांना माहिती देताना अमूलचे अध्यक्ष विपुल पटेल म्हणाले की, 'अमूलच्या शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव मिळावा यासाठी 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या दुधाच्या दरात 20 रुपये लिटरने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमूल कुटुंबातील सदस्य आणि दूध उत्पादकांसाठी अपघाती विमाही उपलब्ध करून देणार आहे. पशुपालकांना दोन लाखांची भरपाई मिळणार आहे. यासोबतच पशुपालकांच्या कुटुंबातील दोन मुलांना विम्याद्वारे दहा हजार रुपयांची आर्थिक मदतही दिली जाणार आहे. विम्याचा हप्ताही अमूल भरणार आहे'.