अमृतसर (पंजाब): पंजाबच्या अमृतसरमधील अजनाळा येथे गुरुवारी हिंसक निदर्शने झाली. 'वारिस पंजाब दा'चे अध्यक्ष अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन केले. जमावाने बॅरिकेड्सही तोडले. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एफआयआर नोंदवल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी अमृतपालचे अनुयायी मोठ्या संख्येने अजनाळा येथील पोलीस ठाण्यासमोर जमू लागले होते. पोलिसांशी वाद झाल्यानंतर समर्थक हिंसक झाले होते.
एफआयआर रद्द करण्याची मागणी:अमृतपाल आणि त्याचे साथीदार अजनाळा पोलिस ठाण्यात पोहोचू नयेत, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता आणि बॅरिकेड्सही लावले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाच जिल्ह्यांतील पोलिसांचा फौजफाटा अजनाळ्यात तैनात करण्यात आला आहे. अमृतपालने असा इशारा दिला होता की, सरकारने त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला नाही, तर आपण अजनाळा येथे सभा घेऊन न्यायालयात जाऊन अटकेची मागणी करू.
अपहरण आणि मारहाण केल्याची तक्रार:चमकौर साहिब येथील रहिवासी वरिंदर सिंग यांनी अमृतपाल आणि त्यांच्या अनुयायांवर एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अजनाला येथे गेले असता त्यांचे अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. अमृतपालने आरोप नाकारले आणि असा दावा केला की, पोलिसांनी मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीच्या तक्रारीवरून त्याच्या आणि त्याच्या अनुयायांवर गुन्हा दाखल केला आहे, जो आधीच त्याच्या गटाच्या विरोधात चुकीचे समज पसरवत होता. मात्र, तो निर्दोष असून, त्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.