अमृतसर :खलिस्तानवादी वादग्रस्त नेता अमृतपाल सिंग याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. पंजाब पोलिसांनी तब्बल 36 दिवसाच्या पाठलागानंतर अमृतपालला पकडण्यात यश आल्याचे स्पष्ट केले. अमृतपाल सिंगच्या आईने मात्र आपल्या मुलाने शिख धर्मातील पेहरावानुसार पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याचे स्पष्ट केले आहे. अमृतपालने शीख बाणा तयार करत पंज बनियाचे पठण करून पोलिसांना शरण आल्याचे बलविंदर कौर यांनी स्पष्ट केले आहे.
भिंद्रनवालेंच्या गावातून केली अटक :पंजाब पोलिसांनी वादग्रस्त खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंगला मोगा येथील रोडेतील गुरुद्वारातून अटक केली आहे. अमृतपाल सिंगला घेराव घालून अटक केल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे. मात्र अमृतपाल सिंगने आत्मसमर्पण केल्याचा दावा त्याच्या आई बलविंदर कौर यांनी केला. पंजाबच्या मोगा येथील रोडेच्या गुरुद्वाराबाहेर अमृतपाल सिंगने आत्मसमर्पण करण्याची योजना आखल्याच्या बातम्या माध्यमातून येत होत्या. रोडे हे खलिस्तानी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे मूळ गाव आहे.
अमृतपाल सिंगला पाठवले आसाममध्ये :अमृतपाल सिंगने आपल्या समर्थकांना सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यावर चाल करुन गेला होता. यावेळी अमृतपाल सिंगने शस्त्रास्त्रांसह पोलीस ठाण्यात धुडगूस घातला होता. रविवारी पोलिसांनी तब्बल 36 दिवसाच्या पाठलागानंतर पकडल्याचा दावा केला आहे. त्यानंतर पोलिसांनी लगेच अमृतपालला आसाममधील दिब्रुगड येथील तुरुंगात पाठवले आहे. अमृतपाल सिंगला पकडल्यानंतर त्याच्या आईने माध्यमासमोर येत अमृतपालच्या अटकेबाबत काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.