दिब्रुगड (आसाम): अमृतपाल सिंग याला डिब्रूगड येथील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले आहे. मोहनबारी विमानतळावर आल्यानंतर अमृतपालला आसाम पोलिसांच्या ताफ्याद्वारे दिब्रुगडच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. त्याच बरोबर दिब्रुगडमधील मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर आणि आत लष्कर आणि कमांडोने प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. सीआरपीएफचे जवानही तैनात करण्यात आले होते. अमृतपालला ठेवण्यासाठी तुरुंगातही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
आयबी करणार चौकशी:खलिस्तान समर्थक नऊ नेते आधीच दिब्रुगड तुरुंगात बंद आहेत. अमृतपालला त्या नऊ खलिस्तानी नेत्यांसोबत ठेवले जाईल की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. अमृतपाल सिंग याच्याविरोधात एनएसए वॉरंटची आज अंमलबजावणी झाली. NSA अंतर्गत अटक करण्यात आलेल्या कैद्यांना कोणत्या पद्धतीने ठेवायचे याबाबत दिब्रुगड येथील मध्यवर्ती कारागृहात सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमृतपालची डिब्रूगड तुरुंगात NIA आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) चौकशी करणार आहे. अमृतपाल सिंग 36 दिवसांपासून फरार होता, दोन दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांचे पाच सदस्यीय पथक दिब्रुगड तुरुंगात पोहोचले होते आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली होती आणि अटकेत असलेल्या नऊ खलिस्तान समर्थकांची चौकशी केली होती.