नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल केंद्रातील सरकारवर महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा आरोप केला होता. यावर अमित शाह यांनी उत्तर दिले. 'आम्ही महाराष्ट्रात सरकार पाडले, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. मात्र महाराष्ट्रातील पहिले सरकार शरद पवार यांनीच पाडले होते', असे प्रत्युत्तर अमित शाह यांनी दिले. 'वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून त्यांनी भारतीय जनसंघाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते', असे अमित शाह म्हणाले.
विरोधकांकडे नाव बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता : 'UPA च्या काळात विरोधकांनी देशात १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे केले. त्यामुळेच त्यांनी आपले नाव बदलले. विरोधकांकडे नाव बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता', अशी टीका अमित शाह यांनी केली. 'आम्हाला मात्र कोणतेही नाव बदलण्याची गरज नाही. अटल सरकारने आणि सध्याच्या मोदी सरकारने असे कोणतेही काम केले नाही, ज्यामुळे आम्हाला मान खाली घालावी लागेल', असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : यावेळी अमित शाह यांनी राहुल गांधींवर नाव न घेता टीका केली. या सदनात एक असा नेता आहे ज्याला राजकारणात १३ वेळा लॉन्च करण्यात आले आहे, असे अमित शाह म्हणाले. एनडीने एकदा दलित तर एकदा आदिवासी व्यक्तीला राष्ट्रपती बनवले, असेही ते म्हणाले. मोदी सरकारने गेल्या ९ वर्षात अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आणली. आता २०२७ पर्यंत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी जगातील एकमेव नेते आहेत ज्यांना १४ देशांचा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे, असेही अमित शाह म्हणाले.