इंफाळ : मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी सीबीआयने सहा गुन्हे दाखल केले आहेत. खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्या आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे शस्त्र आहेत, त्यांनी ते शस्त्र पोलिसांकडे जमा करावी, नाहीतर उद्यापासून कोम्बिंग ऑपरेशन रावण्यात येणार असून गुन्हेगारांची गय केली जाणार नसल्याचे अमित शाह यांनी ठणकावले आहे. यावेळी मणिपूर हिंसाचाराची निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी करण्यात येणार असल्याचेही अमित शाह यांनी स्पष्ट केले.
शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार कटीबद्ध :मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूर दौऱ्यावर गेले आहेत. अमित शाह मणिपूर येथे पत्रकार परिषद घेत आहेत. सरकार मणिपूरमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. विस्थापित नागरिकांना त्यांच्या घरी परत येण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी दिली.
इंफाळमधील मदत छावणीला भेट :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कांगपोकपी येथील एका मदत शिबिराला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील कुकी समुदायाच्या सदस्यांची भेट घेतली. मणिपूरमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केले. नागरिकांचे घरी परतणे सुनिश्चित करण्याचा आमचा निर्धार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. डोंगराळ भागात आणि चुराचंदपूर, मोरे आणि कांगपोकपी येथे आपत्कालीन गरजांसाठी हेलिकॉप्टर सेवा प्रदान केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी नागरिकांना दिले.