नवी दिल्ली:शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीवरून महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांची ही बैठक नड्डा यांच्या निवासस्थानी झाली. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री शिंदे हे मुंबईत नसून, काही आमदारांसह गुजरातमधील सुरत शहरातील एका हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत, असे वृत्त समोर येत असतानाच या दोन्ही नेत्यांची भेट होत ( Shah meets Nadda amid political turmoil in Maharashtra ) आहे.
त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, विधानपरिषद निवडणुकीनंतर सोमवारी रात्री काही आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही हे खरे आहे, परंतु आता काही आमदारांशी संपर्क साधण्यात पक्षाला यश आले आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे मुंबईत नाहीत, मात्र त्यांच्याशी संपर्क झाला आहे. राऊत यांनी मात्र शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत हे स्पष्ट केले नाही.