नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात नवीन कृषी कायद्यांबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. काल (मंगळवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकरी नेत्यांना बैठकीसाठी बोलावले. रात्री अकरा वाजल्यानंतरही सरकार आणि शेतकरी यांच्यात एकमत झाले नाही. त्यामुळे अमित शहा यांचा प्रयत्न असफल झाला. तसेच सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये आज (बुधवार) होणारी बैठक सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
बुधवारी सरकार आणि शेतकरी यांच्यात कोणतीही बैठक होणार नाही-
काल बैठक संपल्यानंतर अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मुल्ला म्हणाले की, बुधवारी सरकार आणि शेतकरी यांच्यात कोणतीही बैठक होणार नाही. सरकारकडून बुधवारी शेतकरी नेत्यांना प्रस्ताव देण्यात येईल. त्यानंतर प्रस्तावावर शेतकरी नेते बैठक घेतील.
बैठकीत कोणताही निकाल लागलेला नाही-
बैठकीस उपस्थित नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कोणताही निकाल लागलेला नाही. बैठकीत शेतकऱ्यांनी तिन्ही बिले रद्द करण्याच्या मागणीची पुनरावृत्ती केली. तर शासनाने दुरुस्तीच्या प्रस्तावाची पुनरावृत्ती केली. आता सरकार आपला प्रस्ताव शेतकऱ्यांना देईल आणि बुधवारी शेतकरी त्या प्रस्तावावर चर्चा करतील.