अहमदाबाद- गेली पाच दिवस सुरतमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सुरतमधील भाजप कार्यालयाकडून रेमडेसिवीरचे मोफत वाटप करण्यात येत आहे. ही इंजेक्शन घेण्यासाठी कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांनी लांबलचक रांग लावली आहे. ही रांग थेट अर्धा किलोमीटरपर्यंत गेली आहे.
सुरतमधील उधाना परिसरात असलेल्या भाजपच्या कार्यालयाबाहेर कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांनी रांगा लावल्या आहेत. कोरोनाबाधितांना रेमडेसिवीर मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील सिव्हिल रुग्णालयाबाहेरही रुग्णांच्या नातेवाईक रांगेत उभे राहून रेमडेसिवीर मिळण्याची प्रतिक्षा करत आहेत.
हेही वाचा-रेमडेसिवीरच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश; दोघांना अटक, 272 इंजेक्शन जप्त
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुजरातला 3 लाख इंजेक्शन मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. तर गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांनी रुग्णालयाबाहेर भाजपचे कार्यकर्त्यांकडून गरजुंना मोफत इंजेक्शन देणार असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेनंतर भाजप कार्यालयाबाहेर कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांनी सकाळपासून एकच गर्दी केल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा-रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवा, एप्रिल अखेर दिवसाला दीड लाख इंजेक्शन लागण्याची शक्यता - राजेश टोपे
सुरत येथील भाजपचे खासदार दर्शना जर्दोश म्हणाल्या की, गृह विलगीकरणात असलेल्यांसाठी आणि डॉक्टरांनी चिठ्ठी दिलेल्यांसाठी ही व्यवस्था आहे. सध्या सुमारे 1 हजार इंजेक्शनचे वितरण करण्यात आले आहे. इतरांना टोकन दिले असल्याने त्यांना उद्या इंजेक्शन मिळू शकणार आहे. सुरत भाजप अध्यक्ष निरंजन जनझमेरा हे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले की, सी. आर. पाटील यांनी 5 हजार इंजेक्शनच्या ऑर्डर दिल्या आहेत. आधार कार्ड आणि डॉक्टरांची चिठ्ठी दाखविल्यानंतर गरजुंना एक इंजेक्शन देण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली.