नवी दिल्ली :मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी नोबेल पारितोषिक विजेते आणि प्रख्यात अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांच्या निधनाचं वृत्त आलं होतं. नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांच्या नावाच्या 'X' अकाउंटवरून ही माहिती शेअर झाली होती. मात्र हे वृत्त खोटं असल्याचं निष्पन्न झालंय. अमर्त्य सेन ठणठणीत असल्याची माहिती त्यांच्या मुलीनं 'ईटीव्ही भारत'ला दिली.
निधनाची बातमी खोटी : 'ईटीव्ही भारत'शी बोलताना नंदना म्हणाल्या की, अमर्त्य सेन जिवंत आहेत आणि चांगलं काम करत आहेत. 'ही फेक न्यूज आहे. बाबा एकदम बरे आहेत', असं त्यांनी सांगितलं. ही बातमी @profCGoldin या बनावट X हँडल वरून आली, ज्यात युझरनं तो अर्थशास्त्रज्ञ क्लॉडिया गोल्डिन असल्याचा दावा केला आहे. क्लॉडिया गोल्डिन यांना सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालं होतं.
प्रभावशाली विचारवंत आहेत : अमर्त्य सेन हे एक प्रभावशाली विचारवंत आहेत, ज्यांना अर्थशास्त्र, सामाजिक तत्वज्ञान आणि कल्याणकारी अर्थशास्त्रातील त्यांच्या व्यापक योगदानासाठी ओळखलं जातं. डॉ. सेन यांनी त्यांच्या अतुलनीय कार्यानं जगावर एक अमिट छाप सोडली आहे. त्यांना जगभरात व्यापक प्रशंसा आणि आदर मिळालाय.
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारानं सन्मानित : ३ नोव्हेंबर १९३३ रोजी पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन येथे जन्मलेल्या सेन यांनी जगभरातील प्रतिष्ठित विद्यापीठं आणि संशोधन संस्थांमध्ये शिक्षण घेतलंय. सेन यांना १९९८ मध्ये कल्याणकारी अर्थशास्त्रातील योगदान तसेच दुष्काळ, दारिद्र्य आणि मानवी विकासावरील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त, सेन यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक प्रतिष्ठित पदं भूषवली. त्यांनी हार्वर्ड, केंब्रिज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यांनी 'डेव्हलपमेंट अॅज फ्रिडम' आणि 'द आयडिया ऑफ जस्टिस' यासारखी पुस्तकं लिहिली आहेत.
हेही वाचा :
- अमर्त्य सेन यांना जमीन रिकामी करण्याच्या विश्वभारतीच्या आदेशाला कलकत्ता उच्च न्यायालयाकडून स्थगिती
- Amartya Sen Sues Visva Bharati : जागेच्या वाद प्रकरणी अमर्त्य सेन यांनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; विश्वभारतीवर दाखल केला खटला
- Mamata Warns Visva Bharati : अमर्त्य सेन यांचे घर पाडल्यास करणार आंदोलन, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा इशारा