नवी दिल्ली Lakshadweep Flight Booking : भारत आणि मालदीव यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लक्षद्वीपला सेवा देणारी एकमेव विमान कंपनी 'अलायन्स एअर'नं तेथे अतिरिक्त उड्डाणं सुरू केली आहेत. लक्षद्वीपला भेट देऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे या भारतीय विमान कंपनीनं कोची-अगत्ती-कोचीसाठी अतिरिक्त उड्डाणं सुरू केली. ही उड्डाणे आठवड्यातून दोन दिवस म्हणजे रविवार आणि बुधवारी चालतील, असं अलायन्स एअरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
तिकिटांची प्रचंड मागणी : 'अलायन्स एअर' ही लक्षद्वीपमध्ये कार्यरत असलेली एकमेव एअरलाइन आहे. ती केरळमधील कोची आणि अगत्ती बेटांदरम्यान उड्डाणं भरते. तेथे लक्षद्वीपला सेवा देणारा प्रादेशिक विमानतळ आहे. ही एअरलाइन्स या बेटावर दररोज 70 आसनी विमानं चालवते. विमानं पूर्ण क्षमतेनं धावत असून मार्चपर्यंतची सर्व तिकिटं विकली गेली आहेत, असं विमान कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. आम्हाला फोन आणि सोशल मीडियावर तिकिटांबाबत अनेक प्रश्न येत आहेत. तिकिटांच्या प्रचंड मागणीनंतर या मार्गावर अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्यात आली. आवश्यक असल्यास, फ्लाइटची वारंवारता वाढवली जाईल, असं या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.