प्रयागराज Gyanvapi Mosque Case :वाराणसीच्या ज्ञानवापी प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयानं मंगळवारी (19 डिसेंबर) अंजुमन इंतेजामिया मस्जिद समिती आणि या प्रकरणाशी संबंधित पाचही याचिकांवर मोठा निकाल दिलाय. उच्च न्यायालयानं मुस्लिम पक्षकारांच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. तसंच या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयानं 1991 च्या खटल्याच्या सुनावणीस मान्यता दिली. शिवाय या प्रकरणाची सुनावणी 6 महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं वाराणसी न्यायालयाला दिलेत.
एएसआय सर्वेक्षणाला आव्हान देणारी याचिकाही फेटाळून लावली :आज पार पडलेल्या सुनावणीत अलाहाबाद उच्च न्यायालयानं वाराणसीच्या ज्ञानवापी स्वयंभू विश्वेश्वर नाथ मंदिराच्या मालकीसंदर्भात दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या. या प्रकरणी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात सुरू असलेला दिवाणी खटला 6 महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. यावेळी एएसआय सर्वेक्षणाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयानं फेटाळून लावलीय. न्यायालयानं म्हंटलंय की, एएसआयने सर्वेक्षण केलं आहे. त्यामुळं त्याला आव्हान देता येणार नाही. न्यायालयानं एएसआयला आपला अहवाल जिल्हा न्यायालयात सादर करण्याचे आणि आवश्यक असल्यास पुढील सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाला प्रार्थनास्थळ कायद्याचा काहीही अडथळा नाही, असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं.